वृत्तसंस्था / चेन्नई
2025 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील चुरशीच्या सामन्यात पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सचा टायब्रेकरमध्ये पराभवचा धक्का दिला. पुणेरी पलटनने या सामन्यात अष्टपैलु कामगिरीचे प्रदर्शन घडवित विजयासह स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
पुणेरी पलटन आणि बेंगळूर बुल्स यांच्यातील हा सामना निर्धारीत वेळेत 29-29 असा बरोबरीत होता. त्यानंतर पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला.टायब्रेकरमध्ये पुणेरी पलटनने बेंगळूर बूल्सचा 6-4 असा निसटता पराभव केला. पुणेरी पलटनने या स्पर्धेच्या इतिहासामध्ये बेंगळूर बुल्सचा पहिल्यांदाच टायब्रेकरमध्ये फडशा पाडला. पुणेरी पलटनतर्फे आदित्य शिंदे आणि आशिष मलिक तसेच बेंगळूर बुल्सतर्फे अलीरझा मिर्झान यांची कामगिरी दर्जेदार झाली.
सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सवर 12-9 अशी केवळ तीन गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सवर 17-13 अशी बढत मिळविली होती. 33 व्या मिनिटाला बेंगळूर बुल्सने पुणेरी पलटनचे सर्वगडी बाद करत तीन गुणांची आघाडी मिळविली होती. पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये आदित्य शिंदे आणि आशिष मलिक यांनी पुणेरी पलटनला आपल्या शानदार अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर विजय मिळवून दिला.









