वृत्तसंस्था/विशाखापट्टणम्
2025 सालातील येथे सुरू असलेल्या बाराव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सचा 45-36 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार अस्लम इनामदार आणि आदित्य शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली. या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर कर्णधार इनामदार, आदित्य शिंदे आणि विशाल भारद्वाज यांनी आपल्या शानदार चढायांवर झटपट गुण वसुल केले. पुणेरी पलटणच्या आक्रमक खेळासमोर बंगाल वॉरियर्सला बचावात्मक धोरण स्वीकारावे लागले. त्यांच्या बचावफळीवर चांगलेच दडपण पहिल्या 10 मिनिटांत आले होते. या कालावधीत कर्णधार इनामदारने आपल्या चढायांवर वॉरियर्सच्या नितीशकुमार आणि पार्तीक यांना बाद केले. या सामन्यातील दुसऱ्या टप्प्यात दोन वेळा सर्वगडी बाद झाले. सामन्यातील शेवटची 10 मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सवर 37-28 अशी आघाडी मिळविली होती. शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुणेरी पलटणने आणखीन गुण वसुल करत बंगाल वॉरियर्सचे आव्हान 9 गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.









