वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या अटितटीच्या सामन्यात पाटणा पायरेटसने पुणेरी पल्टनचा 37-32 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे पाटणा पायरेट्सने स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
पाटणा पायरेट्सतर्फे देवांकने 11 तर अयानने 9 आणि शुभम शिंदेने 5 गुण नोंदविले. पुणेरी पल्टनतर्फे अभिनेश नादरजन आणि अमन यांनी अनुक्रमे 7 आणि 2 गुण नोंदविले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पल्टनने पाटणा पायरेट्सवर 16-13 अशी 3 गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तराधार्थ पाटणा पायरेट्सने पुणेरी पल्टनचे सर्वगडी बाद केले. देवांकच्या या कामगिरीमुळे पाटणा पायरेटसने पिछाडी भरुन काढत पुन्हा बरोबरी साधली. देवांकच्या शानदार चढाईमुळे पुणेरी पल्टनचे सर्वगडी बाद झाल्याने पाटणा पायरेट्सने 5 गुणांची आघाडी मिळविली होती. त्यांनी ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत पुणेरी पल्टनचे आव्हान संपुष्टात आणले.









