वृत्तसंस्था/ अहमदाबाद
10 व्या प्रो कबड्डी लिग हंगामातील येथे झालेल्या सामन्यात अर्जुन देसवाल आणि कर्णधार अस्लम इनामदार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटणने विद्यमान विजेत्या जयपूर पिंक पँथर्सला 37-33 अशा 4 गुणाच्या फरकाने पराभवाचा धक्का दिला.
सोमवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणच्या अर्जुन देसवालने 17 गुण मिळवले. तर पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळताना अस्लम इनामदारने 10 गुण नोंदविले. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला. या सामन्यात सुरूवातीला पुणेरी पलटणने जयपूर पिंक पँथर्सवर 6-3 अशी आघाडी मिळविली होती. 6 व्या मिनिटाला इराणचा कबड्डी पटू मोहम्मदेजा चिनाहला अजितकुमारने बाद केले. त्यानंतर पँथर्सच्या चढाईपटूंनी आपल्या डावपेचात अधिक बदल केला. पँथर्सच्या अर्जुनने आपल्या शानदार चढाईच्या जोरावर पलटणच्या बचावफळीवर चांगलेच दडपन राखले होते. 14 व्या मिनिटाला अभिनेश नेदराजन आणि मोहित गोयाट यांच्या शानदार चढाईच्या जोरावर पुणेरी पलटणचे सर्व गडी बाद झाले. आणि या सामन्यात पहिल्यांदाच पिंक पँथर्सने पुणेरी पलटणवर 14-10 अशी आघाडी मिळविली होती. अर्जुनने आपल्या पुढील तीन चढायांवर गुण घेत मध्यंतरापर्यंत आपल्या संघाला 4 गुणाची आघाडी मिळवून दिली होती. सामन्याच्या उत्तरार्धात अर्जुनने आपल्या पहिल्या दोन चढायावर संघाला आणखी 2 गुण मिळवून दिले. यावेळी पँथर्सचे पारडे पुणेरी पलटणच्या तुलनेत अधिक जड वाटत होते. कर्णधार अस्लम इनामदार आणि अर्जुन देसवाल यांच्या शानदार कामगिरीमुळे पुणेरी पलटनने जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद केले. 30 व्या मिनिटाला दोन्ही संघ 25-25 असे बरोबरीत होते. सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना पुणेरी पलटणने जयपूर पिंट पँथर्सवर 6 गुणांची आघाडी मिळवली होती. कर्णधार अस्लमने शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपल्या सुपर रेडवर पँथर्सचे आव्हान 37-33 असे संपुष्टात आणले.









