पुणे / वार्ताहर :
पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय पुण्यातील कोंढवा परिसरात 2017 पासून अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या येमेन देशातील सहाजणांविरूद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा येमेनमध्ये पाठविण्यात आले आहे. संबंधित आरोपी 2017 मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतामध्ये आले होते.
अलखराज वालेद अब्दुराबुअतेह (वय 37), साउदी अब्दुरबू अतेक अल खराज (वय 34), हेबायाहना मोहम्मंद हुसेन (वय 33) यांच्यासह तीन अल्पवयीनांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे.
संबंधित परदेशी विद्यार्थी व्हिसावर 2017 मध्ये भारतात आले होते. तेव्हापासून ते अवैधरित्या कोंढव्यात वास्तव्य करीत होते. त्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये एफआरओ कार्यालयाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यातील तीन अल्पवयीनांसह महिलेला हडपसर रेस्क्यु फाऊंडेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या पासपोर्ट व व्हिसाची वैधता संपल्यामुळे ते येमेन देशाच्या दुतावासाकडून प्राप्त करुन घेण्यात आले. त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्यात येणार होते. मात्र, नागरिकांचा तिकडे जाण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांनी एफआरओ कार्यालयाविरोधात लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली. संबंधित याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. मायदेशात जाण्यासाठी संबंधित नागरिक तयार नव्हते. विशेष शाखेने येमेन दुतावासाच्या मदतीने त्यांचे विमान तिकीट आरक्षित केले. त्यानंतर 24 डिसेंबरला त्यांना हद्दपार करण्यात आले.
अधिक वाचा : शुक्लांच्या अडचणी वाढल्या; फोन टॅपिंग प्रकरणी नव्या चौकशीचे कोर्टाचे आदेश