ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. जी-20 परिषदेसंदर्भातील कार्यक्रम विद्यापीठात होणार असल्याचे कारण विद्यापीठाने पुढे केले आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी, वसतिगृह, भोजनगृहाचा दर्जा, राष्ट्रीय शैक्षणीक धोरण आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी नाना पटोले 10 मे ला विद्यापीठात येणार होते. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी पटोलेंचा ‘विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यापीठात 10 मे ला G20 परिषदेच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याने विद्यापीठ प्रशासनाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, तरी देखील पटोलेंचा कार्यक्रम घेण्यावर विद्यार्थी संघटना ठाम आहेत.








