पुणे / प्रतिनिधी :
पक्षाने संधी दिली, तर पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याची इच्छा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघ सोडला होता. त्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कुलकर्णी म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीवेळी मी पक्षाचा आदेश पाळला होता. आताही पक्षाने आदेश दिला, तर लोकसभा निवडणूक लढवेन. पुणे लोकसभेसाठी माझे नाव चर्चेत आहे. पक्षाने विश्वास दाखवला, तर मी नक्कीच निवडणुकीच्या मैदानात उतरेन. आजपर्यंत मी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. यापुढेही मी कोणतीही जबाबदारी पाडण्यासाठी कटिबद्ध असेन.
उमेदवारीसाठी रस्सीखेच
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली असून, येथे पोटनिवडणूक होण्याची शक्मयता आहे. भाजपमधून मेधा कुलकर्णी यांच्याशिवाय संजय काकडे, जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ तसेच गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत. ब्राम्हण समाजाला डावलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कसब्यासारख्या बालेकिल्ल्यात भाजपाला काँग्रेसकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली, तर भाजप कोणाला उमेदवारी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मेधा कुलकर्णी यांचे राजकीय पुनर्वसन होणार का?
चंद्रकांतदादा पाटील यांच्याकरिता मेधा कुलकर्णी यांना आपला हक्काचा मतदारसंघ सोडावा लागला. त्यानंतर विधान परिषदेवर कुलकर्णी यांचे पुनर्वसन होईल, असे मानले जात होते. मात्र, तेथेही त्यांची निराशा झाली. आता पुणे लोकसभा निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








