पुणे / प्रतिनिधी :
जगभरातील चित्रपट दिग्दर्शक, अभ्यासक, रसिक यांच्याकरिता पर्वणी असलेला 21 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ्फ काही अपरिहार्य कारणास्तव तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, चीनसह विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून, खबरदारी म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता हा महोत्सव काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात येत असून, महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी कळविले आहे.
अधिक वाचा; Pune : वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी प्रकार; दोन तृतीयपंथीयांना अटक
गतवर्षी फिल्म फेस्टिव्हल उत्साहात पार पडला होता. मात्र, त्याआधीच्या दोन वर्षांत पिफ्फला मोठा फटका बसला होता. यंदा पिफ्फ उंबरठय़ावर असतानाच तो पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आल्याने चित्रपट रसिकांचा हिरमोड झाला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील चित्रपट रसिकांकरिता पर्वणी मानला जातो. जगभरातील विविध भाषांतील दर्जेदार चित्रपट या महोत्सवात पाहण्याची संधी रसिकांना मिळत असते. तसेच देशोदेशीचे अभ्यासकही यानिमित्ताने भेटत असतात. तथापि, या महोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसत आहे. सध्या चीन, अमेरिका, ब्राझील, कोरिया यांसह विविध देशांत कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.