ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सर्वधर्मीय, शिवप्रेमी व पुणेकरांतर्फे आज पुण्यात कडकडीत बंदसह मूक मोर्चा काढण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अन्य प्रमुख नेते आणि शिवप्रेमी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांची तातडीने हकालपट्टी करावी, कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, भारतीय जनता पक्षानेही माफी मागावी, या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ झाला. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौकमार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे जाहीर सभेने मूकमोर्चाची सांगता होणार आहे.
या मूकमोर्चास पुणे शहर व जिल्हय़ातील गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिला असून, मंडळांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना सर्वस्वी नागरिक स्वयंस्फूर्तीने या बंद व मोर्चात सहभागी आहेत.