अजितदादा तुम्ही उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच एकत्र एकाच व्यासपीठावर आलो असून अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. तसेच इथे पोहोचायला तुम्ही थोडा उशीर केला असल्याचे विधान भाजप नेते आणि देशाते सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी आज केंद्रिय सहकारी संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रिय निबंधक सहकारी संस्था या पोर्टलचे आनावरण केले त्यावेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धी’ संकल्पनेवर आधारित अनेक कार्यक्रम घेतले जात असून सहकार चळवळीला बळकट करणारे हे त्याचे उद्देश आहे. पुण्यात आज अमित शहा यांच्या हस्ते केंद्रिय निबंधक संस्था या पोर्टलचे अनावरण केले यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, ““अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला म्हणजे भाजपशी युती करायला तुम्ही थोडा उशीर केला” असे ते म्हणाले.
अमित शहांच्या या विधानानंतर यावर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या जागेवरून हात जोडून अमित शाह यांना अभिवादन केले. त्यानंतर आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, “अमित शाह हे गुजरातमधून येत असले तरी त्यांचे महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. आणि प्रत्येक जावयाचे आपल्या सासुरवाडीवर प्रेम असते. यापुर्वी महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. महाराष्ट्र आणि गुजरातचा राज्याचा सहकार क्षेत्रातील इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली आहे,” असेही अजित पवार यांनी आपले मत मांडले.








