यावषी जानेवारीच्या 31 तारखेला म्हणजे माघ शुद्ध दशमी या दिवशी दरवषीप्रमाणे पंढरपूर येथे भक्त पुंडलिक उत्सव साजरा करण्यात येत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगासोबत नेहमी पुंडलिकाचे नाव जोडले जाते आणि म्हटले जाते ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ म्हणजे पुंडलिकाला वर देण्यासाठी आलेला विठ्ठल. पुंडलिक आपले आईवडील जे पांडुरंगाचे भक्त होते त्यांची सेवा करीत असताना पांडुरंग त्याच्या झोपडीत आले त्यावेळी पुंडलिकाने त्याला थोडा वेळ उभारण्यासाठी जवळच पडलेली विट दिली आणि त्यावर पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभे राहिले. विटेवरी ठेला म्हणजे विटेवर उभारलेला यासाठी त्यांचे नाव ‘विठ्ठल’ झाले.
भक्त पुंडलिक हे विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होते. भक्त भगवंताच्या भेटीसाठी जातात हे सर्वजण जाणतात पण भगवंत आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आले असे हे पुंडलिक होते. भगवंतांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. देवीदेवतांसाठी, मोठमोठय़ा योग्यांसाठीही श्रीहरीचे दर्शन दुर्लभ असते. प्रखर तपस्या, ध्यानधारणा यासारख्या साधनांनीही श्रीहरीचे दर्शन होणे कठीण आहे परंतु भक्त पुंडलिकाने आपल्या श्रे÷ भक्तीने आणि वैष्णव सेवेने भगवंताना आपल्याकडे आकृष्ट केले आणि कलियुगातील सर्व जीवांच्या कल्याणासाठी पंढरपूर येथे थांबवून ठेवले.
पंढरपूर ज्यावेळी लोहदंड क्षेत्र या नावाने ओळखले जायचे त्यावेळी तेथे जानूदेव आणि मुक्ताबाई हे धर्मपरायण, सात्विक आणि सदैव भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये मग्न असलेले पतीपत्नी राहत होते. श्रीहरीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नाव होते पुंडलिक. प्रथमतः लहानपणी कुसंगतीमुळे पुंडलिक आपल्या आईवडिलांशी नीट वागत नसे, त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नसे, उलट त्यांना अपमानित करीत असे. यामुळे त्यांच्या आईवडिलांना खूप दुःख होत असे. पुंडलिक वयात येईपर्यंत आईवडिलांनी असा त्रास सहन केला पण नंतर त्यांनी धर्मपरायण जीवन जगण्यासाठी काशीला प्रयाण केले. आईवडिलांचा आश्रय नसल्यामुळे पुंडलिकाला आता त्यांचे महत्त्व कळू लागले आणि तोही आपल्या आईवडिलांच्या शोधात निघाला. याचवेळी त्याच्या जीवनात परिवर्तन करणारा एक प्रसंग घडला.
प्रवासात असताना एका रात्री त्रिवेणी संगमावर विश्रांती घेण्यासाठी थांबला असताना रात्रीच्या वेळी त्याला भ्रमित करून सोडणारे एक दृश्य दिसले. तीन अत्यंत कुरूप दिसणाऱया स्त्रिया घागरी घेऊन एका आश्रमात आल्या. त्या तिघींनी आश्रमाची झाडलोट केली, सडासंमार्जन केले त्याक्षणी त्या तीनही स्त्रिया दिव्यरूप आणि तेजस्वी दिसू लागल्या. पुंडलिकाला त्यांच्यातील दिव्य परिवर्तन पाहून आश्चर्य वाटले. तेव्हा पुंडलिक त्यांच्यासमोर जाऊन म्हणाले, ‘आपण तिघी कोण आहात?’ परंतु त्या तिघींनी पुंडलिकाची दुष्ट, साधुनिंदक, दुराचारी, पापी म्हणून निर्भर्त्सना केली. त्यावेळी पुंडलिकाला आपल्या आईवडिलांची आठवण झाली, त्यांनी दिलेल्या धर्मोपदेशाची आठवण झाली आणि कृतज्ञतेने पुंडलिकाचा कंठ दाटून आला, त्याच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागले, त्यांनी केलेल्या चुकांचा त्याला पश्चात्ताप झाला. अश्रुपूर्ण नयनाने त्याने त्या तिन्ही दिव्य स्त्रियांची माफी मागितली आणि त्यांना शरण जाऊन ‘माझा उद्धार करा’ असे म्हणत त्यांच्या पायावर नम्रतेने डोके ठेवले. पुंडलिकाची पश्चात्तापाची भावना पाहून त्या तिन्ही स्त्रिया म्हणाल्या “आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. सर्व पापी लोक आमच्या पाण्यामध्ये स्नान करून आपली पापे पाण्यात सोडतात म्हणून आम्ही या आश्रमातील कुक्कुटस्वामी यांची नम्रतेने सेवा करून त्या पापातून मुक्त होण्यासाठी येथे येतो.’’
त्यानंतर त्या नद्या म्हणाल्या, “अरे पुंडलिका, ऊठ, तुझा जन्म आज सार्थकी लागला आहे, तुझे सुकृत फार मोठे आहे, त्यामुळे तुला कुक्कुट ऋषीसारख्या महापुण्यशील योग्याचे दर्शन झाले, तुला आमचे दर्शन झाले, परिणामी तुला ज्ञानदृष्टी प्राप्त झाली आहे. कुक्कुटस्वामी हे मोठे परम पवित्र हरिभक्त आहेत, अत्यंत सदाचारी, सद्वर्तनी असून ते अत्यंत तेजस्वी आहेत. त्यांनी आपल्या भगवत्भक्त आईवडिलांची सेवा केली, तुझ्यासारखे दुराचाराने, असभ्यपणे, असद्विवेकाने वागले नाहीत. म्हणून तू सदाचाराचे पालन कर, सद्वर्तनी हो, ज्या भगवत्भक्त आईवडिलांचा तू अपमान केलास त्यांची क्षमा मागून त्यांची सेवा कर. तुझे भाग्य खूप मोठे आहे, भगवंताची तुझ्यावर कृपा आहे, ते स्वतः तुला भेटावयाला येतील.’’
आता पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत एका झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करू लागले. कालांतराने श्रीकृष्ण हे आपली रुसलेली पत्नी रुक्मिणी हिच्या शोधार्थ द्वारकेहून येथे एके दिवशी आले. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या प्रिय भक्ताची भेट घेण्याची त्यांची इच्छा झाली. त्यावेळी भगवंत पुंडलिकाच्या झोपडीमध्ये आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या भगवत्भक्त आईवडिलांची अतिशय प्रेमपूर्वक सेवा करीत होता. पुंडलिकाने भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर उभे आहेत हे पहिले आणि आपल्या आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून जवळच पडलेली एक विट त्याने भगवंतांना उभे राहण्यासाठी दिली. भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर कमरेवर हात ठेवून प्रतीक्षेत उभे राहिले. आदी पुराणमध्ये सांगितले आहे ये मे भक्तजनः पार्थ न मे भक्ताश्च ते जनः। मद्भक्तानां च ये भक्तास्ते मे भक्ततमा मतः।। अर्थात ‘हे अर्जुन, जे लोक माझे भक्त आहेत वास्तविकतेने माझे भक्त नाहीत. परंतु जे माझ्या भक्तांचे भक्त आहेत ते माझे भक्त आहेत.’’ पुंडलिकाचे आईवडील हे भगवान श्रीकृष्णाचे प्रेमळ भक्त होते, त्यांची सेवा करताना पुंडलिकाला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले “मी तुझ्या मातापित्यांची सेवा करण्याने प्रसन्न आहे कारण ते माझे निस्सीम भक्त आहेत, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी येथे आलो आहे, तेव्हा तू इच्छित वर माग.’’
पुंडलिक म्हणाले “हे भगवंत! आपण स्वतः इथे असताना मी दुसरे काय मागणार?’’ भगवंताचा भक्त हा भक्तीमध्ये संतुष्ट असतो म्हणून त्याला काहीही भौतिक इच्छा नसतात. परंतु भगवान श्रीकृष्णाने आग्रह केल्यानंतर कलियुगातील सर्व जीवांचे कल्याण व्हावे म्हणून पुंडलिक म्हणाला “सुंदर हास्य असलेले, सुंदर दृष्टी असलेले, सर्वाना इच्छित वर देणारे आपण येथेच निवास करावा. सर्व प्राणिमात्र आपल्यातील भक्तांविषयीचा प्रेमळपणा पाहोत, देवांनादेखील दुर्लभ, परंतु माझ्या कारणाने इथे उपस्थित झालात, जीव घोर अशा संसारसागरात बुडाल्याने, दुःखी झालेल्या जीवांचा त्राता, रक्षणकर्ता अशा स्वरूपामध्ये येथे आपले दर्शन घेऊन ते तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेवोत. ज्ञानविरहित, मूर्ख, पापी लोकांना देखील आपले दर्शन प्राप्त व्हावे. तसेच हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे आणि भक्तवत्सल म्हणून आपण आपल्या सुंदर अशा स्वरूपात येथेच वास करावा.’’ तेव्हापासून हे क्षेत्र पंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. देवता, गुरु, आईवडील, वृद्ध इत्यादींची सेवा करणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हे निश्चितच चांगले आहे पण त्यांना भगवान श्रीकृष्ण समजून अथवा श्रीकृष्णभक्तीचा पर्याय म्हणून त्यांच्यावर प्रेम करणे आणि सेवा करणे हा प्रत्यक्ष श्रीकृष्णाप्रती अपराध आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव । आचार्य देवो भव, अतिथी देवो भव।। याचा अर्थ माता पिता गुरु आणि अतिथी हे भगवंत म्हणून नव्हे तर भगवंताचे प्रतिनिधी म्हणून वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. यांच्याकडून आपण भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे शिकतो.
या घटनेचा इतिहास सांगताना संत तुकाराम एका अभंगात म्हणतात, स्वयंभू आमुचा विटेवरी उभा। चैतन्याचा गाभा पांडुरंग ।।1।। नाही घडविला नाही बैसविला । पुंडलिका आला भेटावया ।।2।। द्वारकेची अवघी घेवोनि संपत्ती । आले हृषीकेशी पंढरीसी ।।3।। तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती। त्यांच्या मुखाप्रती किडे पडो ।।4।। साक्षात सत्चिदानंद द्वारकाधीशच येथे विठ्ठल रूपात प्रकट झाले आहेत, द्वारकेचे ऐश्वर्य घेऊन प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच येथे आपला भक्त पुंडलिक याला भेटावयास आले आणि येथेच विसावले आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून कुणी मूर्तीकाराने बनविली नाही अथवा या मूर्तीची कोणी प्राणप्रति÷ा केली नाही, असे कोणी समजत असेल म्हणत असेल तर, तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या मुखात किडे पडोत.
सर्व जण विठ्ठल रुक्मिणीला जाणतात पण त्यांना पंढरपुरात आणणाऱया भक्त पुंडलिकाचे स्मरण करण्याचा हा पुण्य दिवस. चला! प्रेमाने गर्जुया ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’.
-वृंदावनदास









