ऑनलाईन टीम/तरुण भारत
काश्मीर विभागातील पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असल्याचे वृत्त आहे. तर एक CRPF जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पिंगलाना येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तुकडीवर गोळीबार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक CRPF जवान जखमी झाला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर सीआरपीएफ जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा हल्ला अशावेळी झाला आहे, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ४-५ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते ४ ऑक्टोबरला राजौरी आणि ५ ऑक्टोबरला बारामुल्ला येथे असतील.
अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ५ दिवसांत ७ दहशतवादी मारले गेले आहेत. या दौर्यादरम्यान ते या राज्यातील सुरक्षास्थितीचा आढावा घेतील, दोन सभांना संबोधित करतील तसेच वैष्णो देवीचे दर्शन घेणार आहेत.