बेळगाव : खोकला आणि कमी रक्तदाबामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका रुग्णावर पल्मनरी मेकॅनिकल थ्रोम्बोक्टमी उपचार करून रुग्णाला जीवदान मिळवून देण्यात केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील डॉक्टर यशस्वी झाले आहेत. उत्तर कर्नाटकात प्रथमच अशा क्लिष्ट प्रकाराची चिकित्सा डॉ. कोरे रुग्णालयात करण्यात आली. कप्पलगुद्दी, ता. रायबाग येथील 31 वर्षीय एका तरुणाच्या फुफ्फुसात दोष निर्माण झाला होता. मॅसिव्ह पल्मनरी इम्बोलिझमचा प्रकार रुग्णात आढळून आला होता. कमी रक्तदाबामुळे श्वासोच्छवासासाठी तरुणाला तीव्र त्रास होत होता.
त्याला डॉ. कोरे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर हृदयरोगतज्ञ डॉ. समीर अंबर व डॉ. संजय पोरवाल यांनी तपासणी करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत क्लिष्टकारक चिकित्सा डॉ. एस. बी. पट्टेद, डॉ. विजय मेटगुडमठ, डॉ. प्रसाद एम. आर. व डॉ. विश्वनाथ हेसरूर यांच्या सहकार्याने पूर्ण केली. या चिकित्सेनंतर दोनच दिवसात रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पल्मनरी इम्बोलिझम ही एक गंभीर स्थिती असून ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन फुफ्फुसाच्या रक्तप्रवाहात अडथळा येतो. रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या उपचाराने दूर न केल्यास रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. अत्यंत क्लिष्ट चिकित्सा यशस्वी केलेल्या डॉक्टरांचे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम. दयानंद यांनी अभिनंदन केले आहे.









