यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमारला संधी मिळण्याची शक्यता
‘टी-20’ संघात रिंकू सिंग, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाडची वर्णी लागण्याची चिन्हे
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
भारताच्या जागतिक कसोटी स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळे कदाचित अनेकांना प्रचंड धक्का बसलेला नसला, तरी संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या वरिष्ठ खेळाडूंच्या जागा धोक्यात येऊ शकतात. यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार हे वरील दोन खेळाडूंची जागा घेण्यासाठीच्या शर्यतीत असून निवड समितीने कठीण स्पर्धांसाठी खेळाडूंची पुढील तुकडी तयार करणे सुरू केले आहे.

भारताचा विंडीज दौरा महिन्याभराचा असेल. 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांनी सुऊवात होईल. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळले जातील, ज्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली एक पूर्ण नवीन संघ मैदानात उतरेल. यात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्यांची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागणे हे संघाला जिव्हारी लागून गेले असेल. या पार्श्वभूमीवर शिवसुंदर दास यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जागतिक कसोटी स्पर्धेच्या नव्या टप्प्यात पाऊल ठेवताना काही पर्यायांचा विचार करतील, अशी चर्चा चालू आहे. सदर टप्पा कॅरिबियनमधील मालिकेपासून सुरू होईल.
सध्याच्या घडीला दिसणारे दोन कमकुवत दुवे पुजारा आणि उमेश यादव असून बऱ्याच काळापासून त्यांनी अपेक्षेनुरुप कामगिरी केलेली नाही. ‘समतोल साधण्याची गरज आहे. निवड प्रक्रिया ही हटविण्याची प्रक्रियाही असते. परंतु आपल्याला युवा खेळाडू आणि अनुभव यांचे मिश्रण आवश्यक आहे. दृष्टिकोन दीर्घकालीन असायला हवा आणि आता तर दोन वर्षांच टप्पा विचारात घ्यायला हवा. माझ्या मते, यशस्वी जैस्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे. त्याने रणजी, इराणी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये दुहेरी शतके झळकावलेली आहेत. संयमाने खेळण्याच्या बाबतीत तो भक्कम दिसतो आणि पुरेशा संधी देऊन त्याची वाढ घडविली जाऊ शकते, असे निवड समितीचे माजी सदस्य देवांग गांधी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय निवड समितीच्या आणखी एका माजी सदस्याने गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या बांगलादेश दौऱ्यानंतर बीसीसीआयने ‘अ’ स्तरावरील कोणताही दौरा न आखल्याबद्दल टीका केली. मात्र आपल्या नावाचा हवाला देण्यास त्याने नकार दिला. ‘उमेश हा त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. पण ‘अ’ स्तरावरील एकही दौरा न आखल्यामुळे कोण-कोण तयार आहेत हे कळू शकले नाही. एक काळ असा होता की, आमच्याकडे मयंक अग्रवाल, ऋषभ पंत, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी हे ‘अ’ स्तरावरील सततचे दौरे आणि अन्य मालिकांतून तयार होते. आता ते माहीत नाही. माझ्या मते फक्त गोलंदाज मुकेश कुमार तयार आहे, पण तो सीम गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज नाही’, याकडे त्याने लक्ष वेधले.
दुसरीकडे, मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर के. एल. राहुल कधी पुनरागमन करू शकेल हे सांगणे कठीण आहे, शिवाय तो आता नेतृत्वाच्या शर्यतीतही नाही. कर्णधार रोहित शर्मा, त्याचा सध्याचा फॉर्म आणि तंदुऊस्ती लक्षात घेता, आणखी दोन वर्षे कसोटी क्रिकेट खेळणे चालू ठेवून जागतिक कसोटी स्पर्धेचा नवीन टप्पा पूर्ण करू शकेल का हा एक महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. तेव्हा तो 38 वर्षांचा असेल. वेस्ट इंडिज दौरा ही युवा खेळाडूंना तयार करण्याच्या दृष्टीने चांगली संधी आहे हे लक्षात घेता पुजाराला बाहेर काढले, तर पुढील एका वर्षात उपकर्णधार म्हणून कोण चांगल्यारीत्या जबाबदारी पेलू शकेल हा आणखी एक प्रश्न आहे.
अनेकांच्या मते, यासाठी 23 वर्षांचा शुभमन गिल योग्य असून त्याला नेतृत्वाच्या भूमिकेसाठी कालांतराने तयार केले जाऊ शकते. रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूकडे सूत्रे सोपवणे हाही एक अल्पकालीन उपाय ठरू शकतो. याबाबतीत विलक्षण मेंदू चालविणाऱ्या आर. अश्विनसारख्या खेळाडूचाही विचार केला जाऊ शकतो, असे गांधी यांनी सूचविले आहे.
‘टी20’ संघात निवडीबाबत मात्र कसलीच संदिग्धता दिसत नाही. हार्दिक पांड्या नेतृत्व करेल. अमेरिकेमध्ये (वेस्ट इंडीज आणि अमेरिका) पुढील वर्षी होणाऱ्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेसह विविध स्पर्धांत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. ‘टी20’ संघाची निवड पूर्णपणे आयपीएलमधील कामगिरीवर आधारित असेल आणि रिंकू सिंग, जितेश शर्मा यांना अंतिम संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. ऋतुराज गायकवाड पुनरागमन करेल आणि यशस्वी जैस्वालचीही वर्णी त्यात लागेल असे दिसते. त्याशिवाय आयपीएलमध्ये 27 बळी घेतल्यानंतर मोहित शर्मा पुनरागमन करू शकतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना क्रिकेटच्या या सर्वांत लहान प्रकारातून वगळले जात असताना मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांना त्यांच्यावरील भार आणि विश्वचषकापूर्वीचे आगामी एकदिवसीय सामने लक्षात घेऊन विश्रांती दिली जाऊ शकते.









