वृत्तसंस्था /होव्ह
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या चेतेश्वर पुजाराने इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी 2024 च्या हंगामात ससेक्स क्लबबरोबर नुकताच नवा करार केला आहे. पुजाराने यापूर्वी म्हणजे गेल्या दोन सलग इंग्लीश कौंटी हंगामात ससेक्सचे प्रतिनिधीत्व केले होते. 2022 साली चेतेश्वर पुजारा बरोबर ससेक्सने पहिल्यांदा करार केला होता. 2024 च्या इंग्लीश कौंटी हंगामात चेतेश्वर पुजारा पहिल्या 7 सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. पुजाराने इंग्लीश कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना 18 सामन्यात 64.24 धावांच्या सरासरीने 1863 धावा जमविल्या असून त्यामध्ये 8 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत पुजाराने 2022 च्या हंगामात ससेक्सचे प्रतिनिधीत्त्व करताना 231 धावांची विक्रमी खेळी केली होती.









