वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा हा सध्या इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्स क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेतेश्वर पुजाराचा संघ ससेक्स हा आघाडीवर आहे. या स्पर्धेच्या नियमानुसार ससेक्स संघाला 12 गुणांचा दंड करण्यात आला असून चेतेश्वर पुजारावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिप डिविजन 2 स्पर्धेत होवे येथे झालेल्या सामन्यात ससेक्स संघाने लिसेस्टरशायरवर विजय मिळवला होता. या साम्यात ससेक्स संघाकडून तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा पेनल्टी नोंदवली गेली. कौंटी क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नियमानुसार एका हंगामात चारवेळा पेनल्टी नोंदवली गेली तर त्या संघाला 12 गुणांचा दंड करुन त्यांच्या कारवाई केली जाते. या नियमावलीनुसार चेतेश्वर पुजारावर एक सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. चालू वर्षीच्या इंग्लिश कौंटी हंगामात चेतेश्वर पुजाराने ससेक्स संघाकडून खेळताना 54.08 धावांच्या सरासरीने 3 शतके झळकवली आहेत. डर्बिशायर विरुद्ध होणाऱ्या सामन्यात ससेक्सचे नेतृत्व टॉम अॅलसॉपकडे सोपवण्यात आले आहे.









