षड्यंत्र अन् लैंगिक पूर्वाग्रहाने त्रस्त झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ पुडुचेरी
पुडुचेरीच्या एकमात्र महिला आमदार आणि मंत्री एस. चंदिरा प्रियंगा यांनी जातीयवाद आणि लैंगिक पूर्वाग्रहाला तोंड द्यावे लागल्याचा दावा केला आहे. तसेच कट अन् धनशक्तीच्या राजकारणाचा आरोप करत मंगळवारी एआयएनआरसी-भाजप आघाडी मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे.
नेदुनकाडुच्या आमदार चंदिरा प्रियंगा या 40 वर्षांनी केंद्रशासित प्रदेशात मंत्री होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. एन. रानागसामी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात प्रियंगा यांना परिवहन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रियंगा या 2021 च्या विधानसभा निवडणुकीत एआयएनआरसीच्या तिकीटावर नेदुनकाडु या राखीव मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.
प्रियंगा यांनी मंगळवारी मंत्रिपद सोडले आहे. तसेच स्वत:च्या राजीनाम्याचे पत्र स्वत:च्या सचिवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाला सोपविले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने राजीनाम्याचे पत्र प्राप्त झाल्याची पुष्टी दिली आहे. स्वत:च्या मतदारसंघातील जनतेमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे विधानसभेत पोहोचले. परंतु राजकीय कटावर मात करणे सोपे नस्लयाची जाणीव झाली आहे. मी धनशक्तीच्या मोठ्या राक्षसाविरोधात लढू शकत नसल्याचे प्रियंगा यांनी स्वत:च्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. जातीयवाद आणि लैंगिक पूर्वाग्रहाची मी शिकार ठरले. मला सातत्याने लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
माझ्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर वन्नियार, दलित किंवा अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित आमदाराला संधी दिली जावी असे आवाहन प्रियंगा यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.









