विद्यार्थ्यांचा उजळणीवर भर : कॉपीमुक्तसाठी बोर्डाचा प्रयत्न : मागील वर्षीप्रमाणेच व्यवस्था
बेळगाव : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. शनिवार दि. 1 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार असल्याने पदवीपूर्व शिक्षण विभाग तयारीला लागला आहे. पेपरफुटी तसेच कॉपीची प्रकरणे होऊ नयेत यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी अवघे पाच-सहा दिवस शिल्लक राहिल्याने विद्यार्थी उजळणीवर भर देत आहेत. यावर्षी 1 ते 20 मार्चदरम्यान पीयूसीच्या परीक्षा होणार आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 21,517 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.
हे फ्रेशर्स विद्यार्थी असले तरी त्यांच्यासोबत रिपिटर विद्यार्थीही परीक्षा देणार आहेत. विज्ञान, वाणिज्य तसेच कला शाखेचे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. पूर्वतयारी परीक्षा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली असून कमी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षक अधिक भर देताना दिसत आहेत. परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी मागील वर्षीपासून सीसीटीव्ही तसेच वेबकास्टिंग केले जात आहे. कॉपीचा प्रकार घडल्यास विद्यार्थ्यासोबत पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येणार असल्याच्या भीतीने मागील वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात कॉपीला आळा बसला होता. गेल्या वर्षी केवळ शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागातीलही कोणत्याही केंद्रांवर गैरप्रकार घडले नाहीत. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
फ्लाईंग स्क्वॉडची केंद्रांवर नजर
यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 परीक्षा केंद्रांवर पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा होणार आहे. मागील वर्षी 42 केंद्रांवर परीक्षा झाली होती. यावर्षी बेळगाव शहरातील एक परीक्षा केंद्र कमी करण्यात आले आहे. बेळगावमध्ये 20, खानापूर 3, रामदुर्ग 5, सौंदत्ती 3, बैलहोंगल 7 व कित्तूर येथील 3 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड तसेच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तारीख विषय
- शनिवार दि. 1 मार्च कन्नड
- सोमवार दि. 3 मॅथेमॅटिक्स, एज्युकेशन, बिझनेस स्टडीज
- मंगळवार दि. 4 मराठी, संस्कृत
- बुधवार दि. 5 पॉलिटिकल सायन्स, स्टॅटीस्टिक्स
- शुक्रवार दि. 7 हिस्टरी, फिजिक्स
- सोमवार दि. 10 अकौंटन्सी, जिओलॉजी
- बुधवार दि. 12 सायकोलॉजी, केमिस्ट्री
- गुरुवार दि. 13 इकॉनॉमिक्स
- शनिवार दि. 15 इंग्रजी
- सोमवार दि. 17 जिओग्राफी
- मंगळवार दि. 18 बायोलॉजी, सोशिओलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स
- बुधवार दि. 19 ऑटोमोबाईल, हेल्थ केअर
- गुरुवार दि. 20 हिंदी









