परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची देखरेख असणार
बेळगाव : पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांना शनिवार दि. 1 मार्चपासून प्रारंभ होत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 21,518 फ्रेशर्स विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कन्नड विषयाचा पेपर होणार आहे. परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक घालण्याचे काम पूर्ण झाले असून सीसीटीव्हीची देखरेख असणार आहे.
दि. 1 ते 20 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे. यावर्षी कॉपीला थारा मिळू नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर असे करणाऱ्या विद्यार्थी व पर्यवेक्षकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून फ्लाईंग स्क्वॉड, त्याचबरोबर इतर पथकांची नेमणूक करण्यात आली असून बेळगाव शहर व तालुक्यात 20 तर खानापूरमध्ये 3 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.
पहिल्याच दिवशी कन्नड विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांची संख्या काहीशी कमी असेल. परंतु, सोमवारपासून पूर्ण क्षमतेने परीक्षेला सुरुवात होणार आहे. शहरासह ग्रामीण भागावरही पदवीपूर्व शिक्षण विभागाचे लक्ष असणार आहे. तशा सूचना पदवीपूर्व शिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे यांनी केंद्र प्रमुखांना दिल्या आहेत.









