वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांना जाहीररित्या फासावर लटकविले जावे, अशी मागणी पाकिस्तानच्या संसदेत करण्यात आली आहे. इम्रानखान हे ज्यू लोकांचे हस्तक आहेत. अशा लोकांना जगण्याचा अधिकार नाही, असे खळबळजनक विधान पाकिस्तान पिपल्स पार्टीचे खासदार रझा रियाझ अहमद यांनी केले. याचे तीव्र पडसाद पाकिस्तानमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात इम्रानखान यांना अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही कारवाई होती. मात्र, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने यांना जामीन संमत केला होता. त्यामुळे त्या देशाच्या संसदेत सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधातही प्रस्ताव संमत करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने इम्रानखानच्या बाजूने निर्णय देऊन आपला पक्षपातीपणा उघड केला आहे, असे मत संसदेत सत्ताधारी आघाडीच्या अनेक सदस्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानचे सरकार सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत आहे. संसदेत सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात प्रस्ताव संमत करुन सरकार हेच साध्य करीत आहे. न्यायालयाने कायद्याप्रमाणे काम करु नये यासाठी पाकिस्तान सरकारचा आटापिटा चालला आहे, अशी टीका इम्रानखानने पाकिस्तान सरकारवर केली आहे.









