संतांकडून भक्तिमार्गाचा आग्रहाने पुरस्कार : हेरंब देऊळकर यांची प्रमुख उपस्थिती
बेळगाव : नामाचा जयघोष आणि समर्पणाची भूमिका हे पंढरीच्या वारीचे प्रयोजन आहे. दु:खाचा समूळ नाश व सुखाची प्राप्ती याला कल्याण किंवा श्रेयस असे म्हटले जाते. हे श्रेयस प्राप्त करण्याचे योग, ज्ञान, वैराग्य, सिद्धांत, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. मात्र, संतांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार आग्रहाने केला आहे. याच भक्तिमार्गाने भक्तजन विठ्ठलाशी जोडले गेले आहेत, असे विचार हेरंब देऊळकर यांनी व्यक्त केले. ‘तरुण भारत’ने वारीचे औचित्य साधून ‘विठू माऊली’ हा विशेषांक प्रसिद्ध केला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शहापूर येथील अत्यंत पुरातन विठ्ठल मंदिरमध्ये या विशेषांकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत हेते. व्यासपीठावर संपादक विजय पाटील व प्रमुख प्रतिनिधी मनीषा सुभेदार आदी उपस्थित होते.
हेरंब देऊळकर म्हणाले, देव प्राप्त करून घेण्याचे एकच असे साधन नाही. कोणाला कधी कोणापासून प्रेरणा मिळेल, हे सांगता येत नाही. आपल्याकडे नवविधा भक्ती आहे, ज्याचा प्रणेता प्रल्हाद आहे. 4 वेद, 108 उपनिषद, 6 शास्त्र, 18 पुराणे, रामायण, महाभारत हे काव्य यांचे बाह्यारंग वेगळे असले तरी अंतरीचे तत्व हे विठ्ठल परमात्माच आहे. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे, हाच वारीचा उद्देश आहे. वारी नामस्मरणाचे महत्त्व सांगतानाच समर्पणाची भूमिकाही शिकविते, असेही त्यांनी सांगितले. विजय पाटील यांनी हा विशेषांक काढण्यामागची भूमिका स्पष्ट करून तरुण भारतच्या आठही आवृत्तींतर्फे विठ्ठल मंदिरांमध्येच या विशेषांकाचे प्रकाशन होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हेरंब देऊळकर यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करून मनीषा सुभेदार यांनी सूत्रसंचालन केले.
‘विठू माऊली’ विशेषांक अत्यंत माहितीपूर्ण
‘विठू माऊली’ हा विशेषांक अत्यंत माहितीपूर्ण आहे. जो प्रथम वारी करतो त्याला याचा उपयोग निश्चितच होणार आहे. पंढरपूरमधील मठ आणि त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य याची माहिती या विशेषांकामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ती संग्राह्या झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.









