मालवण –
डॉ. अंकुश सारंग आणि उज्वला सामंत लिखित ‘गाबित समाज आणि फागगीते’ या पुस्तकाचे प्रकाशन मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात झाले. आपले जीवन लोकसाहित्यात गुंफलेले असते. लोकसाहित्या अभ्यास फार आवश्यक आहे. कारण लोकसाहित्याने जगाचा इतिहास बदलले आहेत. लोकसाहित्य जिवंत असेपर्यंत पृथ्वी टिकणार आहे. ‘गाबित समाज आणि फागगीते’ या पुस्तकातून आज जगाला गाबित समाजाची ओळख झाली आहे. निसर्गाला मानणारा, ग्रामदैवतं आणि फागगीतांवेळच्या धुळवडीवर विश्वास ठेवणारा माणूस या ग्रंथातून जगासमोर आलाय, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी यावेळी केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर, कार्याध्यक्ष श्रीपाद पंतवालावलकर, चारूशीला देऊलकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रा. कैलास राबते, पत्रकार आनंद लोके, महेंद्र पराडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. लोकसाहित्यात प्रवाहित झालेला इतिहास असतो. लोकसाहित्याचे महत्व कधी कमी होणार नाही. ‘गाबित समाज आणि फागगीते’ या पुस्तकातून लोकसाहित्य संकलनाचे ऐतिहासिक काम डॉ. अंकुश सारंग आणि उज्वला सामंत यांनी केले असल्याचे गौरवोद्गार डॉ. कुमरे यांनी येथे काढले.
लेखक डॉ. सारंग म्हणाले, निसर्ग सौंदर्याने सजलेल्या कोकणला लोकनाट्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. राजापूर, जुवे-जैतापूर, विजयदुर्ग, गिर्ये-बांदेवाडी, तिर्लोट-आंबेरी, नाडण-वीरवाडी, मोंड, जामसंडे, कट्टा, मळई, देवगड-आनंदवाडी, मोर्वे, वानिवडे, आचरा, मालवण, वेंगुर्ले, गोवा, कारवार समुद्रकिनाऱयावरील गाबित माछीमार समाजाने फागनाटय प्रकार जोपासलेला आहे. फागांचा हा उत्सव होळी ते धुलीवंदन असा आठ ते दहा दिवस चालतो. होळी सणानिमित्ताने फाल्गुनात ही फागगीते मांडावर कोळीण नाचुन घुमटांच्या तालावर साजरी केली जातात. दोन-तीन फागगीते गायल्यानंतर सोंगे आणून मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले जाते. यातून गाबित समाजाच्या लोकसंस्कृतिचे उत्तम दर्शन घडते. या गीतांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे.