प्रतिनिधी / पणजी
आकाशवाणी मुंबई आणि पणजी केंद्राचे निवृत्त वृत्त-निवेदक शैलेशचंद्र रायकर यांच्या गोव्यातील जत्रोत्सव या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार 27 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 वा. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये होणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक गो. रा. ढवळीकर या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नावेली, सासष्टीचे आमदार उल्हास तुयेंकर व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर त्यावेळी खास अतिथी म्हणून उपस्थित असतील. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत अध्यक्षपद भुषवितील. या पुस्तकात गोव्यातील सत्तावीस जत्रोत्सवांविषयी माहिती दिलेली असून त्यातून गोव्यातील हिंदू संस्कृतीचे दर्शन घडते. गोवा मराठी अकादमीने या पुस्तकाला 40,000 रुपये आर्थिक सहाय्य देऊन गौरविले आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्री अनिल पै यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. गोव्यातील जत्रोत्सव या पुस्तकाचा हा पहिला भाग असून दुसरा भाग पुढील महिन्यात प्रकाशित होईल. या पुस्तकात आणखी पंचवीस जत्रांची महिती दिलेली आहे. साहित्य प्रेमींनी प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक तेजस रायकर यांनी केली आहे.









