बेळगाव : संत बसवेश्वरांनी सामाजिक समानतेची बिजे रोवली. बाराव्या शतकात त्यांनी दिलेले संदेश मनुष्य कुळाच्या विकासासाठी संजीवनी ठरले आहेत. त्यांची शिकवण आत्मसात केली तरच जगात शांतता नांदणार आहे, असे गोकाक येथील कन्नड साहित्य परिषदेच्या अध्यक्षा भारती मदभावी यांनी सांगितले. अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने लिंगायत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘बसवेश्वरांची मूल्ये’ या विषयावर व्याख्यान देताना त्या पुढे म्हणाल्या, समाजात रुजलेली जात, पंथ, लिंगभेदाविरुद्ध लढा देऊन समतेची शिकवण दिली. दया हाच धर्माचे मूळ आहे, याची शिकवण दिली. आजच्या तरुणपिढीने बसवेश्वरांची शिकवण आत्मसात करण्याची गरज आहे.
रत्नप्रभा बेल्लद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात बोलताना कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले, बसवेश्वरांनी समाजव्यवस्था स्वच्छ केली. ते एक क्रांतिकारी युगपुरुष होते. आजच्या पिढीला त्यांचे विचार व्यवस्थितपणे पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने संकल्प करावा. यावेळी वीरशैव वाणीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सोमलिंग माविनकट्टी यांनी स्वागत केले. विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. भालचंद्र बागी, शंकर पट्टेद, सोमशेखर चोण्णद आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सविता विरुपाक्षी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गीता बेनचमर्डी यांनी वचन विश्लेषण केले. नंदिता मास्तीहोळी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. किरण अंगडी यांनी आभार मानले. अनुपमा दोडवाड यांनी सूत्रसंचालन केले.









