मंडूर मंडोदरी मंदिरात सोहळा
पणजी : ज्येष्ठ कवी आणि मंडूर गावचे पुरोहित भानुदास गोविंद देसाई यांनी लिहिलेल्या 4 पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन मंडूर येथील श्री मंडोदरी जटेश्वर मंदिराच्या सभागृहात नुकतेच झाले. या छोटेखानी समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे होते. आमदार विरेश बोरकर, साहित्यिक प्रा. रामराव वाघ, आजोशीचे सरपंच प्रशांत नाईक. पंच सदस्य कु. तेजस्वी नाईव, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, तसेच ज्येष्ठ दिंडी कलाकार व संगीत तज्ञ बाबू गडेकर. अर्जुन नळेकर, शेखर पर्वतकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ‘कवी कल्पवृक्ष’, ‘अमोघज्ञान’, विठ्ठल परमामृत, विचित विश्व अशा 4 पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सागर जावडेकर यांनी लेखक पुरोहित भानुदास देसाई यांचे अभिनंदन केले. देसाई हे नव्वदीमध्ये पोहोचलेले असून त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजविणारा आहे. एक पुस्तक तयार करताना अनेकांची दमछाक उडते आणि देसाई यांनी एकाचवेळी 4 पुस्तके लिहिली. प्रत्येक गोष्टीचा बरकाईने अभ्यास करण्याची या लेखकाची वृत्ती भविष्यात इतर होतकरू साहित्यिकांसाठी मार्गदर्शक ठरावी. गावचे पुरोहितपण करताना साहित्यिक गुण अंगीकारण्याचे प्रयत्न करणे ही तशी सोपी गोष्ट नाही व भानुदास देसाई हे स्वत: सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट कलाकार असल्यामुळेच त्यांच्यात अनेक गुण निर्माण झालेले आहेत. त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्राथनाही प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांनी केली.
फ्रान्सिस्क सिल्वे यांनी सदर लेख भानुदास देसाई यांचे अभिनंदन करताना त्यांनी पुस्तकात मांडलेले विचार आत्मसात करा आणि गावच्या व या राज्याच्या कल्याणासाठी कार्यरत रहा, असे आवाहन करून देसाई यांना दीर्घायुष्य व्यक्त केले. आमदार विरेश बोरकर यांनी देसाई यांच्या या पुस्तकाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतकही केले. देसाई यांनी लिहिलेली पुस्तके जरुर वाचा, आणि त्यातून बोध घ्या. समाजाचे निश्चितच कल्याण करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे. पुस्तक हे तुमच्यासाठी आधार आहे व भानुदास देसाई यांनी खूप चांगले कार्य केलेले आहे. त्याबद्दल बोरकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. रामदास देसाई यांनी सूत्रनिवेदन केले. साई देसाई, पृथ्वी देसाई, हासरी देसाई, निधी देसाई व राशी देसाई यांनी यावेळी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.









