ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील अनेक महत्वाचे खटले हाताळणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam ) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी उज्ज्वल निकम देवेंद्र फडणीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले होते. यावेळी उज्ज्वल निकम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही काळ चर्चा झाली. उज्ज्वल निकम सध्या काही खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम पहत आहेत. या सर्व खटल्यांची माहिती देवेंद्र फडणवीसांनी जाणून घेतल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच उज्ज्वल निकम यांनी ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता निकम हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांनी भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार भविष्यात त्यांच्यावर एखादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवणार का, हेदेखील पाहावे लागेल.
हे ही वाचा : राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये- चंद्रशेखर बावनकुळे
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. यांनतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाल आहे. शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता आणि शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु आहे. यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडली आहे. एखादा खटला त्यांच्याकडे गेला की त्याचा निकाल सरकारच्या बाजूने लागणार, असे जवळपास गृहीतच धरले जायचे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात उज्ज्वल निकम हे एकनाथ शिंदे गटासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावणार का, याविषयी आता चर्चां सुरु आहेत.