पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचे उद्गार : उसगांव पंचायत वास्तुचे उद्घाटन
वार्ताहर / उसगांव
स्वच्छ, हरित आणि प्लास्टिक मुक्त गोवा साकारण्यासाठी सरकारात लोकांचा सहभाग असणे गरजेचे असे प्रतिपादन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. गोवा राज्य पायाभूत साधन सुविधा विकास महामंडळातर्फे उसगांव येथे बांधण्यात आलेल्या एकात्मिक सामाजिक सभागृह व बहुउद्देशीय पंचायत इमारत प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
32 व्या नवीन पंचायत कार्यालयाचे उद्घाटन
आज राज्यातील 32 व्या नवीन पंचायत कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. प्लास्टिक आणि कचरामुक्त, स्वच्छ व सुंदर गोवा करायचा आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक पंचायतीने आपले पंचायत क्षेत्र प्लास्टिक मुक्त ठेवावे. सर्व पंचायतीना कचरामुक्त परिसर ठेवण्यासाठी आवश्यक साधन सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व पंचायतीनी कचरा व्यवस्थापनावर भर द्यावा. प्रत्येकाने आपला गाव स्वच्छ ठेवावा. गाव व रस्ता प्लास्टिक मुक्त ठेवतानाच गोवा सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी पंचायत पातळीवरून सुरुवात व्हायला हवी. प्रत्येक पंचायतीने ही जबाबदारी उचण्याचे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले.
गोव्याचे प्रगतीपथाकडे मार्गक्रमण
गोवा प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करीत आहे. सर्व प्रकारचे विकास प्रकल्प सुऊ आहेत. चांगल्या विकासकामांना विरोध करू नका. गोव्यातील रस्त्यांची सुधारणा झाली आहे. वाढते अपघात ही चिंतेची बाब आहे. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करा. जनतेसोबत राहून लोकांच्या इच्छेनुसार सरकार विकास साधत आहे. विविध प्रकारचे औद्योगिक, शैक्षणिक प्रकल्प सरकार राज्यात आणू पाहत आहे. ज्यामुळे लोकांचे राहणीमान सुधारणार असल्याचे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
500 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार
राज्यातील सर्व मार्गावर प्रवासी बसेसची सोय आहे. ग्रामीण भागातील लोकांचे बसेस अभावी हाल होत आहेत. त्यासाठी आणखी 500 इलेक्ट्रिक कदंब बसेस सरकार विकत घेणार आहे. पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गावागावात निवास कुटीरे व उपहारगृहे उभारून युवकांनी स्वयंरोजगार सुरु करावेत असे आवाहन त्यांनी केले.
गरीब लोकांच्या मनातील विचार सत्यात उतरविणार – मंत्री विश्वजीत राणे
मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, लोकांना हवा तसा मतदारसंघाचा विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे. मतदारसंघातील गरीब लोकांचे परिवर्तन केले जाईल्. गरीब लोकांच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मनातील विचार सत्यात उतरविणे हे आमचे स्वप्न आहे.
उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर उसगांव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, उसगांव गांजे पंचायतीचे सरपंच नरेंद्र गांवकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंचसदस्य प्रकाश गावडे, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्हास, वैभवी गावडे, विलीयम मास्कारेन्हास, गोविंद परब फात्रेकर, रेश्मा मटकर, स्वयंपूर्ण मित्र व पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक, पंचायत सचिव प्रसाद शेट, प्रसाद नाईक, गोवा राज्य पायाभूत साधन सुविधा महामंडळाचे अधिकारी दिलीप जोशी, समाज कार्यकर्ते विनोद शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या आगमनावेळी उसगांव येथील शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकातील कलाकारांनी ढोल ताशा वादनाने व सुवासिनीनी आरती ओवाळून स्वागत केले. सखी सहेली महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. सरपंच नरेंद्र गांवकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अजय बागकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर, गोविंद परब फात्रेकर यांनी आभार मानले. समारंभाच्या शेवटी केक कापून मंत्री विश्वजीत राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.









