जमिनी वाचविण्यासाठी एकवटला बळीराजा : रिंगरोडसाठी आमच्या सुपीक जमिनी देणार नाही : शेतकऱ्यांचा ठाम निर्धार

वार्ताहर /किणये
रिंगरोडच्या विरोधात सोमवारी बेळगुंदी येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात बेळगुंदीसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगुंदी गावात मोर्चा काढण्यात आला. आमच्या सुपीक जमिनी देणार नाही, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विकासाच्या नावावर हडप करण्याचा घाट घातला आहे. शेती वाचली तरच बळीराजा जगणार आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत या जमिनी देणार नाही, असा ठाम निर्धार करण्यात आला असून रिंगरोड प्रस्तावाच्या विरोधात बळीराजा एकवटला आहे.
रिंगरोड प्रस्तावाला विरोध करण्यासाठी बेळगुंदी गावात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेळगुंदी गावात शेतकरी जमू लागले. प्रारंभी बेळगुंदी गावातील हुतात्मा स्मारक येथून आंदोलन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चात ढोल, ताशांचा गजर करण्यात आला. विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावू नका, असे फलक मोर्चात घेतले
होते. आमच्या हक्काची जमीन देणार नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संपूर्ण गावभर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ट्रॅक्टर व जनावरे घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. वास्तविक बेळगावमध्ये झालेल्या अधिवेशनात रिंगरोडच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. यामुळेच तालुका म. ए. समिती शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने हा लढा देऊ, असे मनोगत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी व्यक्त केले.
बेळगुंदी ग्रामपंचायतमध्ये ठराव
या भागातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून शेतीच हिसकावून घेतली तर शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे या भागातील सुपीक जमिनी कदापि देणार नाही. या रिंगरोड प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आम्ही बेळगुंदी ग्रामपंचायतमध्ये तसा ठरावही केला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्षा हेमा हदगल यांनी दिली.
तहसीलदारांना निवेदन
आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगुंदी ग्रामपंचायतीसमोर शेतकरी आल्यानंतर त्या ठिकाणी तहसीलदार कुलकर्णी हे हजर झाले. त्यावेळी कुलकर्णी यांना शेतकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, पुंडलिक पावशे आदींसह बेळगुंदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनाची प्रत पंतप्रधानांना पाठविणार
तालुक्यातील 32 गावांतील सुमारे तेराशे एकर भू-संपादनाचा घाट प्रशासनाने घातला आहे. या रिंगरोड प्रस्तावाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आम्ही हरकती दाखल केल्या आहेत. तालुक्याच्या विविध गावांमध्ये असे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असून त्या भागातील संबंधित प्रशासनाचे अधिकारी तसेच रिंगरोड प्रस्तावाला विरोध, अशा निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी यावेळी दिली.









