शांतता बैठकीत कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचे आवाहन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
डॉल्बीसारख्या कर्कश वाद्याला फाटा देऊन लेझीम, झांजपथक, ताशा, भजनी मंडळसारख्या पारंपरिक वाद्यांच्या निनादात सार्वजनिक गणेशमूर्ती आणून आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी केले. कंग्राळी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवारी कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची काकती पोलीस स्टेशनतर्फे शांतता बैठक बोलाविली होती. यावेळी ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा होत्या. व्यासपीठावर ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, नवनाथ पुजारी, रेखा इंडीकर, अर्चना पठाणे, मेनका कोरडे आदी उपस्थित होते.
ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ग्रा. पं. च्यावतीने पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस निरीक्षक शिंगे पुढे म्हणाले, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीला मोठे महत्त्व आहे. ऑगस्ट 27 ला गणरायाचे आगमन होत आहे. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हिंदू संस्कृतीला गालबोट लागेल, असे कृत्य करू नये. सार्वजनिक गणपती मूर्ती डॉल्बीसारख्या कर्कश वाद्याला फाटा देऊन लेझीम, झांजपथक, बँन्ड, ताशा अशा पारंपरिक वाद्याच्या निनादात आणण्याचे आवाहन केले. विद्युत रोषणाईसाठी मंडळांनी हेस्कॉमची रीतसर परवानगी घ्यावी, विसर्जनवेळी वेळेचे बंधन पाळावे, तलाव किंवा नदीमध्ये मूर्ती विसर्जनवेळी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. बैठकीला कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









