बैठकीत प्रचारासंबंधी सविस्तर चर्चा : विभागवार प्रचाराची रणनीती : आर. एम. चौगुले यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर / हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या जाहीर प्रचाराला शुक्रवार दि. 21 पासून सुरुवात करण्यात येणार आहे. तरी समितीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुऊवार दि. 20 रोजी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराची रूपरेषा ठरविण्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी हे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, उमेदवार आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, मनोज पावशे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, कमल मनोळकर, म्हात्रू झंगरूचे, बी. एस. पाटील उपस्थित होते.
प्रारंभी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामीण मतदारसंघात आर. एम. चौगुले यांच्या प्रचारासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित समिती पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी प्रचारासंदर्भात आपली मते मांडली. तसेच कोणत्याही परिस्थितीत यावेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी विभागवार प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. याला कार्यकर्त्यांनी आपली संमती दर्शवून शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या प्रचार कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची ग्वाही दिली. बैठकीला समितीचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगुंदी परिसरात आज प्रचार
शुक्रवार दि. 21 पासून आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराची सुरुवात बेळगुंदी परिसरातून होणार आहे. त्यानुसार सकाळी 7 वा. बिजगर्णी, बडस, बेळवट्टी, बाकनूर या भागात सकाळी प्रचार होणार आहे. तर सायंकाळी बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बोकमूर गावामध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात येणार आहे. तरी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









