गावोगावी होताहेत बैठका : हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही : सीमाप्रश्नाला पुन्हा बळकटी देण्याचा निर्धार
वार्ताहर /किणये
तालुक्यात हुतात्मादिन संदर्भात गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. या बैठकांना मिळणारा प्रतिसाद पाहता सीमाप्रश्नाच्या खटल्याला नवी बळकटी मिळणार आहे, असे चित्र सध्या तालुक्यात निर्माण झाले आहे.
1 जून रोजी बेळगाव शहरासह तालुक्यात हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. व बेळगावच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्मादिनाच्या कार्यक्रमामुळे सीमालढय़ाला अधिक बळ मिळणार आहे. यामुळेच सीमाप्रश्न काय आहे. याची जाणीव सध्याच्या तरुणाईला करून देण्यात येत आहे.
गेली 65 वर्षे सीमाबांधव आपल्या न्यायहक्कासाठी झगडतो आहे. 1956 साली अन्यायाने मराठी बहुभाषिक असलेला भाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्यानंतर सीमाप्रश्नाची चळवळ सुरू झाली. कन्नड सक्ती बेळगावात लादण्यात आली. या कन्नडसक्तीला तीव्र विरोध झाला आणि काही जणांनी गोळय़ा झेलल्या. सीमाप्रश्नाकरिता प्राणाची आहुती दिली. याच हुतात्म्यांना 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे.
कर्नाटक सरकार वारंवार बेळगावमधील सीमाबांधवांवर अन्यायाने कन्नड सक्ती लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता सीमाबांधवांची एकजूट महत्त्वाची आहे. 1 जून हुतात्मादिनासंदर्भात वाघवडे गावात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आर. के. पाटील होते. या बैठकीला दीपक दळवी, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, सुधीर चव्हाण, शिवाजी सुंठकर, पुंडलिक पावशे, गणेश हुक्केरी, पिराजी मुचंडीकर, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या सर्वांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
पिरनवाडी येथील रामदेव मंदिरात ही जनजागृती बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिराजी मुचंडीकर होते. या बैठकीला पिरनवाडी, खादरवाडी, मच्छे, बाळगमट्टी, कुट्टलवाडी भागातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









