मोक्याच्या ठिकाणी फलकांची उभारणी
बेळगाव : वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जागृतीविषयक फलक लावण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख ठिकाणी फलक लावण्यात येत आहेत. चेनस्नॅचिंग, लक्ष विचलित करून दागिने पळविणाऱ्या भामट्यांपासून नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रमुख ठिकाणी उभारण्यात आलेल्या फलकांवर स्वत:ची सुरक्षा कशी करायची? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या अंगावरील दागिने पळविले जातात. चेनस्नॅचिंगचे प्रकार कसे घडतात? असे प्रकार टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आदींविषयी मार्गदर्शन करतानाच संशयास्पद व्यक्तींविषयी माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.









