जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेरी
बेळगाव : बालविवाहाला कायद्याने विरोध असला तरी अनेक जण चोरून बालविवाह करत आहेत. यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे. मुलांच्या आयुष्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे. बालविवाह त्वरित थांबविण्यात यावेत, यासाठी सेवक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जागृती फेरी काढून पत्रके वाटण्यात आली. बालविवाह लावणे कायद्याने अपराध आहे, याची जाणीव असतानाही अनेक जण कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सूज्ञ नागरिकांकडून याचे उल्लंघन होत असल्याने असे प्रकार त्वरित थांबविण्यात यावेत. वय 21 वर्षे असणारा मुलगा व 18 वर्षे पूर्ण झालेली मुलगी यांचाच विवाह लावण्यात यावा, याची माहिती असूनही बालविवाह लावल्यास दोन वर्षांचा कठीण कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा कायद्यामध्ये नमूद आहेत. याचा विचार करून नागरिकांनी बालविवाह लावण्यापासून दूर राहावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले. बालविवाह लावून शिक्षेचे धनी बनू नका, अशी जागृती करून सेवक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेरी काढण्यात आली. यावेळी परिसरात उपस्थित नागरिकांना माहितीपत्रके वाटून जागृती करण्यात आली.









