मनपातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन : कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याच्या मोहिमेला सुरूवात
बेळगाव : सरकारच्या आदेशानुसार ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची मोहीम महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यास जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. ओला व सुका कचरा कोण-कोणता याबाबतची जनजागृती महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली असून शाळांमध्ये त्याची जनजागृती शुक्रवारी करण्यात आली आहे. शहरातील विविध मराठी व कन्नड शाळांमध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जाऊन विद्यार्थ्यांना कचऱ्याची माहिती दिली. घरातील कचरा कशा प्रकारे जमा करायचा, त्याचे वर्गीकरण कसे करायचे, याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्लास्टिक असेल तर ते स्वतंत्र ठेवावे. याचबरोबर भाजीचा कचरा स्वतंत्र रहावा तर शिजविलेल्या भाज्या, शिल्लक राहिलेले अन्न एका बादलीमध्ये जमा करावे. स्वतंत्रपणे ओला-सुका कचरा आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा. त्यामुळे साऱ्यांचेच श्रम तसेच वेळ वाचेल, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन
महापालिकेचे कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन हे मार्गदर्शन केले आहे. शाळांमध्ये जनजागृती झाली तर निश्चितच त्याचा या योजनेला चांगला लाभ होईल म्हणून महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली याला सुरूवात करण्यात आली आहे.









