प्रतिनिधी / मडगाव
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी बुधवारी रात्री त्या शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर याला अटक केली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिकेची तक्रार आल्यानंतर, कुंकळ्ळी पोलिसांनी गोवा बाल अधिनियम, भारतीय दंड संहितेच्या कलम 8, कलम 354 (अ) (विनयभंग), कलम 12 अंतर्गत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि माहिती
तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 (अ) आणि 67 (ब) अंतर्गत शिक्षक रमेश गावकर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. विनयभंगाची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. क्रीडा प्रशिक्षणावेळी पीटी शिक्षक रमेश गावकर याने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाठविले होते. पीटी शिक्षकाकडून होत असलेल्या विनयभंगाची कल्पना पालकांना दिल्यानंतर पालकांनी मुख्याध्यापिकेशी संपर्क साधला व हा किळसवाणा प्रकार कथन केला. त्यानंतर मुख्याध्यापिकेनेच पोलीस तक्रार नोंद केली.
यापूर्वी सुटका झाली होती
रमेश गावकर हा सांगे परिसरातील एका हायस्कूलमध्ये पीटी शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यावेळीसुद्धा त्याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते. त्यावेळी पोलीस तक्रार करावी व शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी झाली होती. मात्र, हायस्कूलच्या समितीने हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ न देता, परस्पर मिटविल्याने त्याची सुटका झाली होती.









