सलामीवीर प्रतीका रावल…सध्या चालू असलेल्या महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय संघाची एक महत्त्वाची सदस्य…25 वर्षांच्या या खेळाडूनं तिच्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भरपूर आशा जागविलीय आणि महिला क्रिकेटमधील भारताच्या भावी मोठ्या खेळाडूंपैकी एक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातंय…
- दिल्लीतील एका क्रिकेटप्रेमी कुटुंबात जन्मलेल्या प्रतीकाच्या हातात वयाच्या तिसऱ्या वर्षी वर्षी बॅट आली. तिचे वडील प्रदीप हे स्वत: विद्यापीठ स्तरावरील क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे द्वितीय स्तरावरील पंच. आपण जे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही ते आपल्या मुलीनं करावं ही इच्छा बाळगून त्यांनी तिला क्रिकेटचे धडे देण्यास प्रारंभ केला…
- पुढं त्यांनी तिला रोहटक रोड जिमखाना क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक शर्वण कुमारकडे नेलं. इशांत शर्मा व हर्षित राणासारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिलंय ते त्यांनीच…अकादमीतील एकुलती एक मुलगी असलेल्या प्रतीकाला मुलांबरोबर प्रशिक्षण घ्यावं लागत असल्यानं अनेकदा टोमणे, टीकेचा सामना करावा लागला. परंतु तिनं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. उलट वेगवान चेंडूंचा करावा लागलेला सामना, जाळ्यात बरोबर केलेला सराव अन् मुलांसोबतची क्षेत्ररक्षण सत्रं यांनी तिला मानसिक नि तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवलं…
- लहानपणी क्रिकेटसोबतच ती नियमितपणे बास्केटबॉल खेळायची आणि जानेवारी, 2019 मध्ये दिल्ली इथं झालेल्या 64 व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा ती भाग राहिली होती…
- विशेष म्हणजे दोन्ही खेळ खेळत असतानाही प्रतीकानं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही अन् 2019 मध्ये झालेल्या सीबीएसई परीक्षेत (बारावी) 92.5 टक्के गुण मिळविले. या पार्श्वभूमीवर तिच्याकडे करिअरचा वेगळा मार्ग निवडण्याची मोठी संधी होती, पण क्रिकेट हीच तिची पहिली पसंती राहिली…पुढं तिनं मानसशास्त्रात पदवी घेतली ती 75 टक्क्यांहून अधिक गुणांनिशी…
- मानसशास्त्रामुळं तिला खेळाची मानसिक बाजू समजून घेण्यास मदत झालीय…त्यातूनच फलंदाजीशी सज्ज होताना ती स्वत:शीच बोलते, गोलंदाजाची देहबोली, रनअप आदींचं निरीक्षण करते, डोळ्याला डोळा भिडवून प्रतिस्पर्ध्याला जोखते नि चेंडूचा सामना करण्यापूर्वी प्रत्येक हालचालीचं विश्लेषण करते…
- प्रतीका एकेक पायरी चढत असताना वडिलांनी तिला रेल्वेच्या प्रशिक्षक दिप्ती ध्यानी यांच्याकडे नेलं अन् तिच्या कारकिर्दीला मोलाचं वळण मिळालं…दिल्लीच्या विविध वयोगटातील संघांमध्ये स्थान मिळवलेल्या प्रतीका रावलनं पुढं वरिष्ठ महिला संघात पाऊल ठेवलं अन् 2021 साली पदार्पणाच्या वर्षात दिल्लीतर्फे 155 चेंडूंत 161 धावा काढून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं…
- त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही गेल्या वर्षीच्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात प्रतीकाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. परंतु हा धक्का फार काळ टिकला नाही. काही आठवड्यांनंतर तिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आणि डिसेंबर, 2024 मध्ये तिनं वेस्ट इंडिजविऊद्ध पदार्पण केलं. तेव्हापासून ती सातत्यानं धावा जमवत आलीय. तिचा उल्लेखनीय क्षण नोंदवला गेला तो सहाव्या सामन्यात. आयर्लंडविऊद्धच्या त्या लढतीत तिनं 154 धावांची तडाखेबंद खेळी केली…
- प्रतीकानं आतापर्यंत सात अर्धशतकं व एक शतक झळकावलंय…आपल्या पहिल्या ‘वनडे’ विश्वचषकात खेळताना तिनं इंग्लंडविरुद्धची लढत (6) वगळता प्रत्येक सामन्यात धावा केल्या. श्रीलंकेविऊद्ध 37, पाकिस्तानविऊद्ध 31, दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 37 अन् ऑस्ट्रेलियाविऊद्ध जगातील काही सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांना तोंड देत 75 धावा तसंच स्मृती मानधनासोबत 155 धावांची सलामीची भागीदारी…पाच सामन्यांमधून 186 धावांनिशी प्रतीका रावलला सध्या भारताच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरं स्थान प्राप्त झालंय…
– राजू प्रभू









