प्रतिनिधी /वास्को
दाबोळी विमानतळासमोरील उड्डाण पुलाच्या खांब्याच्या उंचावरील पोकळीत एक महिला आढळून आल्याने खळबळ माजली. ती महिला आत्महत्या करण्याच्या भितीने पोलिसांना आणि अग्नीशामक दलाला घटनास्थळी द्याव घ्यावी लागली. अग्नीशामक दलाने तीची सुटका केलेली असून त्या महिलेची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे दिसून आल्याने तीला बांबोळीतील मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास उघडकीस आली. दाबोळी विमानतळासमोरील उड्डाण पुलाच्या शांतीनगरच्या दिशेने असलेल्या एका खांबावरील पोकळीत एक महिला असल्याचे काही टॅक्सी चालकांच्या नजरेस आल्याने त्यांना धक्काच बसला. या पुलाखाली टॅक्सीचालक टॅक्सी पार्क करीत असतात. ऐवढय़ा उंच खांबावर ती महिला चढली कशी असा प्रश्नही निर्माण झाला. सदर महिला त्या खांब्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या संशयाने टॅक्सी चालकही घाबरले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस व अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक दलाने शिडी लावून त्या महिलेला खाली आणले. सदर महिला कोणताही गोंधळ न करता सुखरूप खाली उतरल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
सदर महिला विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तरे देत नाही. मात्र, तीने आपले नाव स्नेहा नाईक असल्याचे पोलिसांना सांगितले. सदर महिला मध्यमवयीन असून ती कारवारची आहे. ती कारवारी कोंकणी बोलते. आपण इथेच कुणाकडे काम करीत होते तसेच आपल्याला या ठिकाणी कुणी तरी आणून सोडल्याचे ती सांगते. मात्र, ती ऐवढय़ावर उंचावर कशी चढली याचे उत्तर मिळालेले नाही. या पुलाला एका ठिकाणी असलेल्या पोकळीतून ती खांबापर्यंत आली असण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली. मात्र, ती त्याच वाटेने खाली का उतरू शकली नाही असा प्रश्नी उपस्थित झालेला आहे. तीला त्या ठिकाणी कोणी आणून सोडले हेही कोडेच बनून राहिले आहे. सदर महिला मनोरूग्ण असल्याचे दिसून आल्याने तीला वास्को पोलिसांनी बांबोळीतील मनोरूग्णालयात दाखल केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.









