वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानमध्ये खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे (पीएसएल) अजिंक्यपद विद्यमान विजेत्या लाहोर कलंदर्स संघाने जिंकले आहे.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तान्स संघाचा केवळ एका धावेने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने 6 बाद 200 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर मुल्तान्स सुल्तान्स संघाने 20 षटकात 8 बाद 199 धावा जमवल्याने त्याना हा सामना एका धावेने गमवावा लागला. झमान खानच्या शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर मुल्तान्स सुल्तान्स विजयासाठी 4 धावांची जरुरी होती. दरम्यान खुशदील सिंग तिसरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. लाहोर संघातील अष्टपैलू शाहीन आफ्रिदीने फलंदाजीत 15 चेंडूत नाबाद 44 तसेच गोलंदाजीत 51 धावात 4 गडी बाद केले. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये लाहोर आणि मुल्तान्स सुल्तान्स यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला होता.









