गोवा फॉरवर्डचा आरोप : डीजीपीना निवेदन सादर
पणजी ; पोलीस खात्यातील उपनिरीक्षकांची भरती प्रक्रीया चुकीची असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले असतानाही सत्तेच्या बळावर योग्या उमेदवारांना डावलून अयोग्य उमेदवारांची उपनिरीक्षकपदी भरती करण्यात आली आहे. असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशी करण्याचे विधानसभा अधीवेशनात आश्वासन दिले होते, मात्र चौकशी नाममात्र झाली असून त्याबाबत एक पानाचा अहवाल गोवा फॉरवर्डला पाठविण्यात आला. परंतु ही सरकरने जे काही केले ती चौकशी नसून सर्वसामान्य लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे अशी टीकाही प्रभुदेसाई यांनी केली. पोलीस महासंचालकांना निवेदन दिल्यानंतर दिलीप प्रभूदेसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामात, संतोष कुमार सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपनिरीक्षक पदाच्या भरतीबाबत गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने सोमवारी डीजीपी जस्पालसिंग यांची भेट घेतली. कॉन्स्टेबल परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना उपनिरीक्षक पदाच्या लेखी परीक्षेत 98/99 गुण कसे मिळाले. एकूण 15 उमेदवारांच्या बाबत असा प्रकार झालेला आहे. त्यामुळे हा योगायोग होऊ शकत नाही. या प्रकाराबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. ती झाली काय, झाली नसेल तर उपनिरीक्षक भरती प्रक्रीया पूर्ण कशी करण्यात आली असे गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने विचारले असता डीजीपी म्हणाले की लेखी परीक्षा पोलिस विभागाकडून घेण्यात आली नसून शिक्षण विभागाकडून घेण्यात आली आणि त्यांनी लेखी परीक्षेच्या प्रक्रियेची चौकशी केली नाही. तसेच भरती घोटाळ्याच्या चौकशीचे कोणतेही निर्देश पोलिस विभागाला मिळालेले नाहीत, अशी माहितीही त्यांनी डीजीपीनी शिष्टमंडळाला दिली. असल्याचे दिलीप प्रभूदेसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री विधानसभेत चौकशी करण्याचे आश्वासन देतात आणि पोलीस खात्याला चौकशी करण्याचे निर्देश देत नाहीत याचाच अर्थ उपनिरीक्षक भरती प्रक्रीयेत मोठा घोटाळा आहे. कॉन्स्टेबल लेखी परीक्षेत नापास होणाऱ्या किमान त्या 15 उपनिरीक्षकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोवा पॉरवर्डच्या शिष्टमंडळाने केली आहे. उपलब्ध असलेल्या माहितीवरून असे दिसून येते की निवडक उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणही त्यांना अनुकूल करण्यासाठी फेरफार करण्यात आले होते. 1 डिसेंबर 2021 रोजी कॉन्स्टेबलची परीक्षा झाली आणि दुस्रया दिवशी 2 डिसेंबर 2021 रोजी पीएसआयची परीक्षा झाली. काही उमेदवारांनी सलग दोन दिवस या दोन्ही परीक्षांना उत्तरे दिली. कॉन्स्टेबल आणि पीएसआय या दोन्ही परीक्षांना उत्तर देणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची माही मिळविली असता पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत 33 गुणांसह नापास झालेल्या व्यक्तीला पीएसआय पदाच्या परीक्षेत 99 गुण मिळाले असल्याचे आढळून आले आहे. काही उमेदवारांना कॉन्स्टेबलच्या परीक्षेत 15 आणि 18 गुण मिळाले होते त्यांनी दुसऱ्याच दिवशी पीएसआयच्या परीक्षेत अनुक्रमे 5 पट जास्त 99 आणि 98 गुण मिळविले! एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किंवा ज्ञान एका रात्रीत अनेक पटींनी वाढेल असे मानणे देखील हास्यास्पद असल्याचे दिलीप प्रभूदेसाई यांनी सांगितले. पोलीस खात्यात कार्यक्षम, कुशल आणि सुव्यवस्थित कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे. हे पीएसआय ज्यांनी बनावट मार्गाने पोलीखात्यात प्रवेश केला आहे ते राज्य आणि लोकांच्या हितासाठी हानिकारक असू शकतात. गुन्हे अधिक जटिल, संघटित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असताना, भरतीच्या स्तरावर उच्च दर्जाची गुणवत्ता आणि प्रतिभा ओळखली जाणे आवश्यक आहे जेणेकरून राज्य गुन्हेगारी प्रतिबंध, शोध आणि खटला चालविण्यात नेहमीच एक पाऊल पुढे राहील. भ्रष्टाचाराबाबत आपण शून्य सहनशीलता बाळगली पाहिजे, विशेषत: भ्रष्टाचार आणि इतर गुह्यांवर कारवाई करण्यास बांधील असलेल्यांना कामावर घेण्याबाबत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकारण्यांच्या संगनमताने हा मोठा भरती घोटाळा झाल्याचा संशय आहे असेही दीलीप प्रभू देसाई म्हणाले.









