मनपा आयुक्तांकडून बाजारपेठेतील विविध समस्यांची पाहणी : बारा घडघड्यांच्या विहिरीच्या सौंदर्यीकरणासाठी 6 लाखचा निधी
बेळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रभाग क्र. 4 मधील विविध समस्यांची मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवार दि. 13 रोजी पाहणी केली. महात्मा फुले भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणे, नरगुंदकर भावे चौकातील पिंक टॉयलेटला पाणीपुरवठा करणे, त्याचबरोबर कांदा मार्केट आणि भावे चौकातील कचऱ्याची उचल करण्यासाठी कायमस्वरुपी दोन कचरावाहू वाहने तैनात करण्याबाबत यावेळी मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली. बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या.
शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग येणाऱ्या प्रभाग क्र. 4 मधील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा चालविला होता. त्यामुळे सोमवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे, साहाय्यक कार्यकारी अभियंता (पर्यावरण) हनुमंत कलादगी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. 4 मधील विविध समस्या जाणून घेतल्या.
झेंडा चौक, कांदा मार्केट, नरगुंदकर भावे चौक या ठिकाणी भाजीविक्रेते मोठ्या प्रमाणात बसतात. त्यामुळे तेथे कचऱ्याची समस्या आहे. हा कचरा थेट कचरावाहू वाहनात टाकण्यासाठी दोन कचरावाहू वाहने कायमस्वरुपी बाजारपेठेत ठेवण्यात यावीत, अशी मागणी जयतीर्थ सौंदत्ती यांनी केली. त्याला तातडीने मनपा आयुक्तांनी होकार दिला. भाजीविक्रेत्यांकडून महापालिका भूभाडे वसूल करते. पण त्यांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. पावसात तसेच उन्हाळ्यात जमिनीवर बसून त्यांना व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे बसण्याची सोय करण्यासह शेड तयार करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
गणपत गल्लीत डांबरीकरण होणार
कंबळी खूट याठिकाणी स्वच्छतागृह आहे. त्या ठिकाणच्या शाळेच्या आवारात नवीन पे अॅण्ड युज टॉयलेट बांधण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, रविवारपेठेतही टॉयलेट सुरू करण्यात यावे. त्याचबरोबर महात्मा फुले भाजी मार्केटचा प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे, मनपाकडून न्यायालयात योग्य पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मनपाचे कायदा सल्लागार भीमराव जिनऱ्याळकर यांच्याकडून महात्मा फुले भाजी मार्केटची माहिती मिळवावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर गणपत गल्लीत डांबरीकरण केले जाणार आहे.
बारा घडघड्यांच्या विहिरीचा होणार विकास
बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या सोडवून घेण्यासह विकासकामे राबविण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून गणपत गल्लीतील रस्ता नादुरुस्त झाला असून डांबरीकरणाला मंजुरी घेतली आहे. हुतात्मा चौकाचे, त्याचबरोबर बारा घडघड्यांच्या विहिरीच्या सौंदर्यीकरणासाठी 6 लाख रुपयांचा निधी मनपाकडून मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार आहे.









