भारताकडून मालदीवला मोठे संरक्षण सहाय्य ः
वृत्तसंस्था / माले
भारत सरकारकडून हुरवी गस्तनौका आणि लँडिंग क्राफ्ट मालदीवला मंगळवारी प्रदान करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे विदेशमंत्री अब्दुल्ला शाहिद हे मालदीवची राजधानी माले येथे आयोजित या हँडओव्हर सोहळय़ात सामील झाले. भारताकडून भेट म्हणून मालदीवला एक वेगवान गस्तनौका आणि लँडिंग क्राफ्ट पुरविण्यात आले आहे. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यासोबत द्विपक्षीय अन् सामरिक संबंधांमध्ये विस्तार करण्यासाठी चर्चा केली आहे.
भारत-मालदीव संबंध वास्तव्यात विशेष आहेत. तसेच हे संबंध पूर्ण क्षेत्रासाठी मॉडेलच्या स्वरुपात विकसित झाले आहेत. हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने दूर करण्यासाठी सहकार्य वाढविण्याकरता भारत, मालदीव आणि क्षेत्रातील अन्य समान विचारसरणी असलेल्या देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी सोहळय़ाला संबोधित करताना काढले आहेत.
हँडओव्हर सोहळय़ात मालदीवचे अध्यक्ष सोलिह यांनी गस्तनौकेला मालदीव राष्ट्रीय रक्षा दलात सामील केले. दोन्ही देशांचे संबंध काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहेत. दोन्ही देशांनी गरजेच्या वेळी परस्परांचे समर्थन केले आहे. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी याकरता सहकार्यात्मक प्रयत्न सुनिश्चित केले जावेत. तसेच क्षेत्रीय समृद्धी गाठण्यासाठी सागरी साधनसंपदेचा अधिकाधिक वापर केला जावा असे राजनाथ यांनी म्हटले आहे.









