बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी 27 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मागीलवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात 20 कोटी रुपये निधी देण्यात आला होता. यावर्षी त्यामध्ये 7 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासोबतच विकासकामांना गती मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात नैर्त्रुत्य रेल्वेसाठी 7 हजार 564 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यात आता वाढ करून 10 हजार 055 कोटी रुपये नैर्त्रुत्य रेल्वेला देण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन रेल्वेमार्ग निर्माण करणे, रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, नवीन रेल्वेस्थानकांची निर्मिती, उड्डाणपूल अथवा रोड अंडरब्रिज करण्यासाठी हा निधी वापरण्यात येतो. 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 493 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून 8 हजार 191 कोटी रुपये नैर्त्रुत्य रेल्वेला देण्यात आले होते.
लोंढा-मिरज दुपदरीकरणासाठी 106 कोटी
रेल्वेचा प्रवास गतीने व्हावा यासाठी रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. लोंढा-मिरज रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 2024-25 मध्ये 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात 106 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याने निधीची कमतरता भासणार नाही. सध्या लोंढा-मिरज मार्गावरील तुरळक ठिकाणी काम बाकी असून येत्या दोन महिन्यांत दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाढीव निधीमुळे प्रगतीपर कामे गतीने होणार
रेल्वे बोर्डने जाहीर केलेल्या निधीपेक्षा अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वाढीव निधीमुळे नवीन रेल्वेमार्ग गतीने पूर्ण करणे, त्याचबरोबर दुपदरीकरण व विद्युतीकरण करणे सोयीचे होणार आहे.
– मंजुनाथ (नैर्त्रुत्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी)









