जि. पं. सभागृहात आढावा बैठक, जि. पं. सीईओंची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यामध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ग्राम पंचायत स्तरावर प्लास्टिक वापरावर बंदी घालावी, त्याबरोबर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याबराब्sार महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी बालविवाहाबाबत किती तक्रारी नोंद झाल्या आहेत याची चौकशी करावी. दरम्यान महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बालविवाह प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.
बागायत खात्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 2023-24 मध्ये 100 टक्के पिकांचा विमा उतरवला गेला आहे. या अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डाटा लक्षात घेऊन भरपाई दिली जात आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी दर चार महिन्यांनी एकदा पाणी साठवून ठेवणाऱ्या टाक्यांची तपासणी करावी. त्याबरोबर जलस्रोतांची चाचणी करून पिण्याच्या पाण्याचे नमुने घ्यावेत. शाळा 40 वर्षांहून अधिक जुन्या असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्या पाडण्यासाठी पावले उचलावीत. त्याबरोबर येत्या पावसाळ्यात जनतेला विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.









