मुंडरगी तालुका संघर्ष मंचतर्फे आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : गदग जिल्ह्यातील मुंडरगी तालुक्यामध्ये विविध विकासकामे आणि शासकीय सुविधा पुरवाव्यात अशी मागणी मुंडरगी तालुका संघर्ष मंचतर्फे सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. मुंडरगी तालुका विधानसभा मतदारसंघ म्हणून घोषित करा. मुंडरगी येथे नवीन पोस्ट इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ करा, शिवाय शहरात महाविद्यालयाला मंजुरी द्या, महाविद्यालयातील प्राध्यापकांना नोकरीत कायम करा, त्याबरोबर गदग जिल्ह्यातील मुंडरगी हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा, परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीची भरपाई द्या आदी मागण्याही करण्यात आल्या. या तालुक्यामध्ये 52 गावे असून लोकसंख्याही वाढली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता. तालुक्याला विधानसभा मतदारसंघाची गरज आहे. परिसरातील कामगार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी महाविद्यालये सुरू करावी. तालुक्यात अतिवृष्टीमुळे बंधारा फुटून शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशा नुकसानग्रस्त कुटुंबीयांना शेत जमिनीची भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.









