हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कंग्राळी खुर्द-अलतगा ग्रामस्थांचे निवेदन
बेळगाव : सध्या दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शिवारात पाणी साचले आहे. मात्र भात लागवडीसाठी अजूनही पाणी साचणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी विद्युत मोटारींचा आधार घेत काही भागात भात लागवड करत आहेत. मात्र थ्रीफेज वीज पुरवठा वेळेत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत थ्रीफेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी कंग्राळी खुर्द आणि अलतगा ग्रामस्थांनी हिंडलगा येथील हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी वळिवांबरोबरच मान्सूनेही दडी मारली होती. तब्बल दीड महिना उशीराने मान्सूनचे आगमन झाले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे तर मागील चार दिवसांत बऱ्यापैकी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी आता भातरोप लागवडीच्या कामात गुंतले आहेत. लागवडीसाठी शिवारात अधिक पाणी साचणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही पाणी झाले नाही. त्यामुळे तेथील शेतकरी विद्युत मोटारींच्या साहाय्याने विहिरी व कूपनलिकांतील पाणी सोडून भात लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या काळात वीजपुरवठा नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. थ्रीफेज वीजपुरवठा केला तरच पाणी सोडणे शक्य आहे. तेव्हा कंग्राळी, अलतगा, उचगाव यासह पश्चिम भागातील शेतकरी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत थ्रीफेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी करत आहेत. निवेदन देताना ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, कल्लाप्पा पाटील, यशोधन तुळसकर, विनायक कम्मार, पुंडलिक पाटील, चेतन हिरेमठ, मयुर पाटील आदी उपस्थित होते.









