महांतेश कवटगीमठ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील जलसिंचन योजना व मूलभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच मंजूर झालेली कामे त्वरित पूर्णत्वास न्यावीत, अशी मागणी विधान परिषदेचे माजी मुख्य प्रवक्ते महांतेश कवटगीमठ यांनी केली आहे. कवटगीमठ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नुकतेच पत्र पाठविले आहे. कित्तूर कर्नाटक व कल्याण कर्नाटकमध्ये रेंगाळत पडलेली महालक्ष्मी जलसिंचन योजना, चन्नवृषभेंद्र जलसिंचन योजना, अरभावी मतदार संघातील 20 तलांमध्ये पाणी भरणे (तलाव भरणी), सत्तीगेरी जलसिंचन योजना, औराद (जिल्हा बिदर) येथील 36 तलाव भरणे, मेहकल जलउपसा योजना, अमृत सरोवर निर्माण योजना, यल्लापूर (कारवार) तालुक्यातील 100 तलावांची भरणी योजना, ऐनापूर जलउपसा योजना, दिग्गेवाडी (ता. रायबाग) येथील बंधाराचे काम व करगाव जलउपसा योजनेसाठी आवश्यक अनुदान त्वरीत मंजूर करून कामाला गती मिळवून द्यावी, अशी मागणी पत्रातून केली आहे. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था (बिम्स) आवारातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे लोकापर्ण त्वरीत करण्यात यावे. हिडकल (ता. हुक्केरी) हिडकल धरण आवारात उद्यान विकासासाठी अनुदान मंजूर करावे, खानापूर तालुक्याच्या वन परिसरातील गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशाही मागण्या कवटगीमठ यांनी केल्या आहेत.









