डॉ. आंबेडकर संघटनेचे महापौरांना निवेदन
बेळगाव : शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी महानगरपालिकेची खुली जागा डॉ. भीमराव आंबेडकर या सेवाभावी संस्थेला उपलब्ध करावी. या मागणीसाठी त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. डॉ. भीमराव आंबेडकर या सेवा संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना केएस, आयएएस यासह इतर अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र या संस्थेकडे स्वत:ची जागा नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा महानगरपालिकेची खुली जागा या संस्थेसाठी द्यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली आहे. यावेळी बी. बी. तळवार, के. एम. चौगुले, बी. जे. मेत्री, आर. बी. हलगेकर, दीपक मेत्री, रमेश कांबळे यांच्यासह नगरसेवक संदीप जिरग्याळ उपस्थित होते.









