निच्चणकीतील मुस्लीम समुदायाची मागणी
बेळगाव : निच्चणकी ता. कित्तूर येथील मुस्लीम समुदायाला स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तेथील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवार दि. 4 रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निच्चणकी येथे खानभाई घराण्याच्या मालकीची जागा असून, तेथे मुस्लीम समुदायातील मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असतात. मात्र सध्या तेथे अंत्यसंस्कार करण्याला विरोध होत आहे. मुस्लीम समुदायाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने निच्चणकी गावापासून दूरच्या अंतरावरील कित्तूर येथील जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. कित्तूर येथील सर्व्हे नंबर 382 भागात मुस्लीम समुदायाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास अंत्यसंस्कार करणे सोयीस्कर होणार आहे. निच्चणकी गावात मुस्लीम समुदायांची लोकसंख्या हजारांहून अधिक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.









