कंग्राळी बी. के. येथील महिलांची मागणी, जिल्हा पंचायतीला निवेदन
बेळगाव : नरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करून घ्या, वाढीव मजुरी लागू करा, प्रवासभत्ता द्या, कामाची ठिकाणी प्रथमोपचार पेढी, पाणी आणि सावलीची सोय उपलब्ध करून द्या आदी मागण्यासाठी कंग्राळी बी. के. येथील रोहयो कामगारांनी सोमवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले. शिवाय याबाबतचे निवेदन जि. पं. सीईओ यांच्याकडे सुपूर्द केले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. मात्र रोहयोंतर्गत सुरळीत काम मिळत नसल्याच्या तक्रारी महिला कामगारांनी केल्या आहेत. त्याबरोबर 1 एप्रिलपासून रोहयोंच्या मजुरीत 21 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढीव मजुरी तात्काळ लागू करा, अशी मागणी करण्यात आली.
ग्राम पंचायतीतून रोहयोंतर्गत कामे देण्यास टाळाटाळ
शिवाय स्थानिक पातळीवर रोहयो कामगारांना कामे मिळत नसल्याने इतरत्र जावे लागत आहे. यासाठी प्रवास भत्ता देण्यात यावा, वाढत्या उन्हामुळे काम करणे कठीण होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत रोहयो कामगारांसाठी सावली उपलब्ध करा. त्याबरोबर आरोग्यासाठी प्रथमोपचार कीट पुरविण्याबरोबर कामाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रोहयो कामगारांनी केली आहे. ग्रा.पं.तून रोहयोंतर्गत कामे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे रोहयो कामगारांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी ग्राम पंचायतीला जाब विचारावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.









