विधानसौध परिसरात आंदोलन : माजी सैनिकांची मोठी उपस्थिती
बेळगाव : देशाची सेवा केलेल्या माजी सैनिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवा, माजी सैनिकांना महामार्ग टोलमुक्त करा, शैक्षणिक क्षेत्रात माजी सैनिकांच्या मुलांना प्राधान्य द्या, हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना निवडणुकीत आरक्षण द्या, आदी मागण्यांसाठी गुरुवारी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेतर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी सैनिकांनी उपरोक्त मागण्या केल्या. राज्यातील अनेक सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. अशा सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांनाही विविध सुविधा पुरवा, देशात सैनिकांची सेवा मोठी असून याप्रती प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात सैनिक भवन बांधण्यात यावे,
त्याचबरोबर राज्य सरकारी नोकरीमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवाव्यात. इतर देशांमध्ये माजी सैनिकांना विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. मात्र आपल्या देशामध्ये माजी सैनिकांकडे दुर्लक्ष झाले आहे. सैनिक देशाची सेवा करून निवृत्त होतात. त्यानंतर 40 ते 50 कि. मी. दूर असलेल्या शहरी भागात नोकरी करतात. अशावेळी यांच्यासाठी महामार्ग टोलमुक्त करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये माजी सैनिकांच्या मुलांसाठी प्राधान्य द्यावे, तसेच प्रवेश शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणीही माजी सैनिक संघटनेने केली आहे. यावेळी राज्यातील विविध भागातून आलेले माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आदी बहुसंख्येने उपस्थित होते.









